माथेरानमध्ये महागडी शौचालये धूळ खात पडून

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
karjat
 
माथेरान | माथेरान नगरपालीकेने सुमारे ३८ लाख रुपये किमतीची आठ ते दहा शौचालये माथेरानमध्ये आणली होती. मात्र, त्यापैकी काही शौचालये अद्याप दस्तुरी नाक्यावर धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी या सुविधांची गरज आहे, तेथे शौचालये उपलब्ध नसताना इतर ठिकाणी महागडी शौचालये ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
देश-विदेशातून हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. मात्र, पर्यटकांच्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था दयनीय असल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी शौचालयांची गरज असताना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने विशेषतः महिलांना, मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
 
काही ठिकाणी शौचालये असली तरी अनेक ठिकाणच्या शौचालयाबाबतही पर्यटकांच्या तक्रारी आहेत. काही वेळा शौचालयांचे दरवाजे बंद होतात, तर काही ठिकाणी प्रवेशासाठी पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर यंत्रणेतून अधिक नाणी बाहेर पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या शौचालयांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पांडे रोडवरील मैदानात तब्बल तीन शौचालये ठेवण्यात आली आहेत.
 
तर शार्लोट लेकजवळील मंदिराच्या आवारात जुनी तीन आणि नव्याने आणलेली ३८ लाख रुपयांची शौचालये अशी एकूण चार शौचालये ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी शौचालयांची संख्या आणि त्यांची आवश्यकता याबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी माथेरानमधील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.