अलिबाग | गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
यंदा या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याची तसेच पारितोषिके मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही स्पर्धा राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
जिल्हास्तरावर ५० हजारांचे प्रथम पारितोषिक असून, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ७.५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी हीींिीं://सरपशीहेीींर्रीं.श्रिवाज्ञर.ले.ळप या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीकृत तसेच परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट मंडळांची विविध स्तरांवर निवड करण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
त्यामुळे मंडळांना आपल्या गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृतीपर उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्य व्यापक स्तरावर मांडण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठीही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकादमीच्या पोर्टलवरून महाराष्ट्रातील घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती तसेच विविध प्रसिद्ध गणेश मंदिरांतील गणपतींचे लाईव्ह दर्शन घरबसल्या घेता येणार आहे.
याशिवाय नागरिकांना आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे या पोर्टलवर विनामूल्य प्रसिद्ध करता येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक गणेशोत्सव मंडळे आणि कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे पोर्टलवर अपलोड करुन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना राज्यस्तरापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली ओळख निर्माण करण्याची ही संधी असून इच्छुक मंडळांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.