पालकमंत्र्यांच्या नावाने कर्मचार्‍याची शिवीगाळ , पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाकडून दखल

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नावाने अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचार्‍याने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
याप्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून संबंधित कर्मचार्‍यावर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहेत.ना.गोगावले यांचे स्वीय सहाय्यक राजेश जाधव हे सोमवारी (२४ ऑगस्ट) महाड तालुका नायक मराठा समाज सेवा संघाच्या ट्रस्टच्या कामानिमित्त अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेले होते.
 
कार्यालयातील राजेश यादव नावाच्या कर्मचार्‍याकडे संबंधित कामाबाबत बोलत असताना, त्याने पालकमंत्र्यांच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत राजेश जाधव यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. याची दखल घेत अपर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करून संबंधितांना अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.