पनवेल शहरातील स्वरुप रिफायनरी ज्वेलर्समधील अपहाराचा ४८ तासांत शोध,फरार कामगाराला सोलापूरात बेड्या; ६६ तोळे सोने हस्तगत

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधून अपहार झालेल्या ६६.२३ तोळे सोन्याचा अवघ्या ४८ तासांत शोध घेण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी पोलिसांनी हस्तगत केल्या असून, या प्रकरणातील फरार कामगार शुभम मनाजी खिलारे याला सोलापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेण्यात आले.
 
हस्तगत करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने या सोन्याचा अप्रामाणिकपणे अपहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी तातडीने विविध तपास पथके तयार करून शुभमचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी पनवेल शहर तसेच पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
 
त्यानंतर पोलिसांचे पथक त्याचा माग काढत खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे पोहोचले. तेथे शुभम मनाजी खिलारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अपहार केलेल्या सहा सोन्याच्या लगडी, एकूण ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या, हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-३, पनवेल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल आणि पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी केली.
पोलिसांच्या तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि आरोपीच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीपर्यंत पोहोचून चोरीला गेलेले सोने हस्तगत केले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, किरण राऊत, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोलीस नाईक मिथुन भोसले, सोमनाथ म्हात्रे तसेच पोलीस शिपाई किरण कराड आणि शशिकांत काकड यांनी सहभाग घेतला.