पालीत बनावट नोटा वटविण्याचा प्रयत्न , पाचशे रुपयांच्या नोटांसह तरुण अटकेत | पोलिसांची कारवाई

By Raigad Times    26-Aug-2026
Total Views |
ALIBAG
 
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२३ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास पाली बाजारपेठेतील हटाळे नाका ते भोई आळी नाका या मार्गावर चौधरी दूध डेअरी आणि निखील चायनिज कॉर्नर या दुकानांच्या दरम्यान संशयित तरुणाच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. सदर तरुण हा पेण तालुक्यातील फणसडोंगरी, गोळीबार मैदान परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
रविवारी तो पाली बाजारपेठेत आला होता. विविध दुकानांमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या ४१ बनावट नोटा आढळून आल्या. त्यामुळे या नोटा पाली बाजारपेठेत चलनात आणण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
 
या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. या बनावट नोटा त्याच्याकडे कुठून आल्या? त्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का? तसेच या नोटांचा वापर यापूर्वी पाली किंवा परिसरातील अन्य बाजारपेठांमध्ये करण्यात आला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. दरम्यान, बाजारपेठेत बनावट नोटा आढळून आल्याने व्यापार्‍यांनी व्यवहार करताना चलनी नोटांची तपासणी करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.