कर्जत | भरधाव इकोची विद्यार्थिनीला धडक; आर्या ठोंबरेचा मृत्यू

By Raigad Times    25-Aug-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | शाळेतून घरी परतणार्‍या सात वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव इको कारने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्जत-मुरबाड महामार्गावर कुंडलज गावाजवळील गणपती मंदिर परिसरात सोमवारी (२४ ऑगस्ट) ही दुर्घटना घडली. या घटनेने कुंडलज गावावर शोककळा पसरली आहे.
 
आर्या अनिल ठोंबरे ही इयत्ता पाचवीत शिकत होती. सोमवारी शाळा सुटल्यानंतर ती इतर विद्यार्थ्यांसोबत घरी परतत होती. कुंडलज गावाजवळील गणपती मंदिर परिसरात ती आली असता भालिवडी येथील इको चालक अल्पेश कर्णूक यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांच्या भरधाव इकोने आर्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आर्या गंभीर जखमी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
 
मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने आर्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कुंडलज गावात हळहळ व्यक्त होत आहे. आर्यासोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर हा भीषण अपघात पाहिल्याने त्यांनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. दरम्यान, कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघाताची पुढील चौकशी संबंधित पोलिसांकडून करण्यात येत आहे.