अलिबाग | अलिबाग-पनवेल विना थांबा एसटी प्रवाशांना बनावट तिकीट देणार्या अलिबाग आगाराच्या वाहकाविरोधात पोयनाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकीट वितरण मशिनमध्ये छेडछाड करुन तो तिकीट देत असे. १९ ऑगस्ट २०२६ रोजी हा प्रकार उघडकीस आला. या दिवशी पहाटे सुमारे पावणेपाच वाजता पोयनाड येथील एसटी स्टॉपवर ही घटना घडली.
जनार्दन म्हात्रे हे पेण तालुक्यातील कोळवे येथील रहिवासी असून अलिबाग डेपोचे वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पनवेल बस डेपो येथे विना वाहक व विना थांबा बसमध्ये चढणार्या प्रवाशांना तिकीट वितरणाचे कर्तव्य देण्यात आले होते. कर्तव्य बजावत असताना संबंधित वाहकाने महामंडळाने दिलेल्या तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर त्यांनी १० प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे दिल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच निरीक्षण अहवालामध्ये हे १० प्रवासी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ असल्याचे नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात विविध क्रमांकांच्या तिकिटांसमोर ही नोंद करण्यात आल्याचे पोलिसांच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. संबंधित प्रवाशांकडून रोख स्वरुपात रक्कम स्वीकारून ती स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचा आरोपही वाहकावर आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची तसेच शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, या वाहकावर फसवणूक, अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे करीत आहेत.