बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द!

निवडणूक खर्चाचा अहवाल विहित मुदतीत सादर न केल्याने जिल्हाधिकार्‍यांची कारवाइ

By Raigad Times    02-Aug-2026
Total Views |
 murud
 
कोर्लई | मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पाच सदस्यांना निवडणूक खर्चाचा हिशेब विहित मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, रायगड यांनी अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. या सदस्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही सदस्यपद धारण करता येणार नाही.
 
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले होते. मात्र, निवडणूक खर्चाचा हिशेब नियमानुसार निर्धारित मुदतीत सादर करण्यात आला नसल्याचा आरोप करत संजय मधुकर जायपाटील यांनी संबंधित सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
 
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी, रायगड यांनी सुनावणीनंतर उपसरपंच सिद्धीता महेश चुनेकर तसेच सदस्य मनोहर गजानन भोपी, भारती राम बंदरी, जगिता कोटकर आणि लता वाघमारे यांना पाच वर्षांसाठी अपात्र (निरर्ह) ठरविण्याचे आदेश जारी केले. या आदेशानुसार संबंधित सदस्यांना पुढील पाच वर्षे कोणतेही लोकप्रतिनिधीपद धारण करता येणार नाही तसेच कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. या निर्णयामुळे मुरुड तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.