अलिबाग | अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नवजात बालकाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
सुमिता रमेश काटे (रा. बेलोशी, ता. अलिबाग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे २०२२ रोजी प्रसूतीसाठी त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान तीव्र वेदना सुरू होत्या. प्रसूतीदरम्यान अंगात ताकद नसल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची विनंतीही केली होती.
मात्र, त्यावेळी संबंधित ऑनड ्युटी डॉक्टर उपस्थित नव्हते. तक्रारीनुसार, प्रसूतीदरम्यान बाळाचे डोके बराच वेळ अडकून राहिले. वेळेत शस्त्रक्रिया न झाल्याने अखेर सकाळी सामान्य प्रसूती झाली; मात्र नवजात बालकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू (एडी) म्हणून नोंद करण्यात आली होती. अलिबाग पोलिसांनी वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तपासासाठी प्रकरण मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडे पाठविले.
या समितीचा अहवाल २७ जुलै २०२६ रोजी अलिबाग पोलिसांना प्राप्त झाला. अहवालात डॉ. शेंडे या कर्तव्यावर असताना प्रसूतीच्या वेळी उपस्थित नसल्याने आवश्यक वैद्यकीय उपचार वेळेत मिळाले नाहीत आणि त्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. चार वर्षानंतर अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत मराठे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.