कळंबोलीत काही तासांत दोन भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

By Raigad Times    16-Aug-2026
Total Views |
panvel
 
पनवेल । कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांनंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले असून, कळंबोली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पहिला अपघात केंद्रीय वखार महामंडळ परिसरातील स्टील मार्केट रोडवर झाला.
 
कळंबोली येथे राहणारे अमित साईनाथ पवार (37) हे दुचाकीवरून कळंबोली सर्कलकडे जात होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून पवार हे ट्रेलरच्या मागील चाकाखाली आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला.
 
दुसरी घटना त्याच रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेसवेकडे जाणार्‍या मार्गावर देवांशी इन हॉटेलसमोर घडली. अंदाजे 40 ते 45 वर्षांच्या अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दोन्ही प्रकरणी कळंबोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून फरार वाहनचालकांचा शोध घेतला जात आहे. दुसर्‍या मृताची ओळख पटविण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.