सिडकोची 17 स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित,पनवेलमधील सहा, नवी मुंबईतील 11 स्थानकांचा समावेश

By Raigad Times    16-Aug-2026
Total Views |
panvel
 
पनवेल । पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड घडली असून, सिडकोने उभारलेल्या 17 रेल्वे स्थानकांचे मध्य रेल्वेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. यामध्ये पनवेल परिसरातील सहा आणि नवी मुंबईतील 11 स्थानकांचा समावेश आहे.
 
शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत सिडको व मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी हस्तांतरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी आणि मध्य रेल्वेचे अभिषेक गुप्ता यांच्या माध्यमातून संबंधित करारनाम्यासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. सिडकोने नवी मुंबई व पनवेल परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन विविध ठिकाणी रेल्वे स्थानकांची उभारणी केली होती.
 
आतापर्यंत स्थानकांची देखभाल व व्यवस्थापन सिडकोकडून केले जात होते. आता ही जबाबदारी मध्य रेल्वेकडे सोपविण्यात आली आहे. हस्तांतरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष ताबा आणि व्यवस्थापन रेल्वेकडे जाण्यास काही महिने लागणार आहेत. या कालावधीत स्थानकांच्या मालमत्ता, यंत्रणा आणि विविध सुविधांचे टप्प्याटप्प्याने हस्तांतरण केले जाणार आहे.
 
त्यानंतर स्वच्छता, देखभालदुरुस्ती, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, विद्युत व्यवस्था, पादचारी सुविधा, तिकीट व्यवस्था आणि सुरक्षेसह दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे राहणार आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, उपनगरीय रेल्वे हा हजारो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे रेल्वेकडे व्यवस्थापन गेल्यानंतर स्थानकांवरील सुविधा अधिक सुसूत्र आणि दर्जे दार होतील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
323 स्वच्छता कामगारांचे काय ?
दरम्यान, स्थानकांच्या हस्तांतरणानंतर येथे वर्षानुवर्षे काम करणार्‍या 323 स्वच्छता कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे कामगार सिडकोच्या माध्यमातून वेतन घेत होते. मात्र, त्यांना रेल्वेच्या व्यवस्थेत सामावून घेण्यास रेल्वे प्रशासनाकडून विरोध असल्याचा आरोप आझाद कामगार संघटनेने केला आहे.
 
यापैकी तीन स्थानकांवरील 49 कामगारांचे काम बंद करण्यात आल्याने रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. संबंधित कामगारांना न्याय मिळावा यासाठी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी खासदारांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
 
आवश्यक असल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. हस्तांतरणावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, विनोद साबळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, शहरप्रमुख तुकाराम सरक, नगरसेविका सायली सरक, शहरप्रमुख प्रसाद परब यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.