उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार| भारतीय संस्कृतीची मुळे ही राजाश्रयात फुललेल्या भव्य प्रासादांपेक्षाही दूरवर पसरलेल्या जंगलांत, डोंगरदर्यांत आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये अधिक घट्ट रुजलेली दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात अनेकदा उपेक्षित राहिलेल्या, परंतु स्व-संस्कृतीचा वारसा प्राणपणाने जपणार्या या लोकसंस्कृतीचा खरा आत्मा त्यांच्या लोककलांमध्ये वसलेला आहे.
नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या ९२ वर्षांच्या भिकल्या धिंडा यांचा २ ऑगस्ट रोजी खालापूर येथे शेकापच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. या निमित्ताने हा समृद्ध वारसा पुन्हा एकदा जनमानसाच्या पटलावर उजळून निघाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाळवंडे गावच्या या भूमीपुत्राने वयाच्या नवव्या वर्षापासून हातात धरलेला तारपा आज वयाच्या ९२ व्या वर्षीही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने फुंकला जात आहे, ही घटना केवळ एका कलाकाराचे कौतुक करणारी नसून मानवी मूल्ये, निसर्गनिष्ठा आणि लोककलेच्या अथांग श्रीमंतीचे भव्य दर्शन घडवणारी आहे.
तारपा हे केवळ वाद्य नाही, तर तो आदिवासी संस्कृतीचा श्वास आहे. माडाची आणि ताडगोळ्याची पाने, बंबूची नळी आणि वाळलेला दुधी भोपळा (लोकी) अशा अत्यंत साध्या, निसर्गात सहज मिळणार्या घटकांपासून तयार होणारे हे वाद्य विश्वातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नादब्रह्माची निर्मिती करणार्या संरचनेचे रूप धारण करते. या वाद्यामध्ये असलेला नर आणि मादीचा भाग, त्यांच्यातून निघणारा सुरांचा मिलाफ आणि या दोघांना एकत्र बांधून ठेवणारी ती नैसर्गिक कलाकृती म्हणजे केवळ भौतिक वाद्य रचना नसून, निसर्गातील स्त्री-पुरुष समानतेचे आणि परस्परपूरकतेचे प्रतीक आहे.
मानवी श्वासांच्या लयीवर चालणारे हे वाद्य वाजवण्यासाठी लागणारी फुफ्फुसांची ताकद आणि दमसास अचंबित करणारा आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे थोड्याशा शारीरिक श्रमाने माणूस थकतो, तिथे ९२ व्या वर्षीही तासनतास न थांबता, नाचत-गात तारपा वाजवणारे भिकल्या धिंडा हे निसर्गपूरक जीवनशैलीचे चालतेबोलते विद्यापीठ ठरतात. धिंडे घराण्याने तब्बल चारशे वर्षांपासून जपलेली ही परंपरा हे सिद्ध करते की, कला जेव्हा केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता जीवनशैलीचा भाग बनते, तेव्हा ती शतकानुशतके प्रवाही राहते.
ब्रिटिश कालखंडापासून ते आधुनिक भारताच्या प्रवासाचे साक्षीदार राहिलेले भिकल्याजी शाळेची पायरी चढू शकले नाहीत. शिक्षणाचा अभाव असूनही निसर्गाच्या शाळेत शिकलेल्या त्यांच्या तत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. ‘निसर्गाने बनवलेला माणूस हाच देव आहे आणि निसर्ग हीच त्याची पूजा आहे,’ हे त्यांचे साधे पण गहन विचार आजच्या वैज्ञानिक आणि भौतिकवादी जगाला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. ज्या निसर्गाकडून आपण घेतो, त्याची पूजा केली पाहिजे आणि गरज नसताना झाडाचे एक पानही तोडता कामा नये, हा आदिवासी जीवनमानाचा मूलमंत्र आज जगभरात चर्चिल्या जाणार्या पर्यावरणाविषयीच्या सिद्धांतांपेक्षा कितीतरी अधिक व्यवहार्य आणि आदरणीय आहे.
या संवादातून समोर येणारी सर्वात मोठी बाब म्हणजे आदिवासी समाजातील प्रगल्भता आणि आधुनिकता. ज्या समाजाला आजही अनेकदा मागास मानले जाते, त्या समागात शतकांपासून स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणला जातो. तारपा नृत्याच्या वेळी असणारा स्त्री-पुरुषांचा सहभाग असो किंवा विवाहासारख्या महत्त्वाच्या निर्णयात मुलीच्या इच्छेला दिले जाणारे अग्रस्थान असो; ही मूल्ये आजच्या तथाकथित सुशिक्षित समाजालाही थक्क करणारी आहेत.
कायद्याने किंवा चळवळींनी नव्हे, तर परंपरेने आणि संस्कृतीने आदिवासी माणसाला ही पुरोगामी दृष्टी दिली आहे, हे जेव्हा भिकल्याजींसारख्या ज्येष्ठांच्या मुखातून ऐकायला मिळते, तेव्हा आपल्या लोकसंस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव अधिक तीव्रतेने होते. तारपा वादनाला असणारी धार्मिक आणि सांस्कृतिक बंधनेही तितकीच रंजक आणि उद्बोधक आहेत. कोणतेही वाद्य कधीही उचलून वाजवण्याच्या आजच्या व्यावसायिक युगात, तारपा वादनाला नागपंचमीपासून सुरुवात होते आणि ते दिवाळीपर्यंतच वाजवले जाते.
या वादनाला सुरुवात करण्यापूर्वी वादकाला करावा लागणारा उपवास, पाळावे लागणारे सात्त्विक नियम आणि त्यामागील नैसर्गिक कार्यकारणभाव या गोष्टी लोककलेचे पावित्र्य जपण्यासाठी किती आवश्यक आहेत, हे यावरून स्पष्ट होते. हा उपवास केवळ धार्मिक कर्मकांड नसून, निसर्गातील बदलणार्या ऋतूंचे स्वागत करण्याचा आणि शरीराला नव्या ऋतूशी जुळवून घेण्याचा एक आरोग्यदायी मार्ग आहे.
भिकल्या धिंडा यांचे आरोग्य आणि त्यांची दैनंदिन जीवनशैली हा आजच्या तरुण पिढीसाठी मोठा धडा आहे. या वयातही त्यांची टिकून असलेली दृष्टी, मजबूत दात आणि निरोगी शरीर हे रानभाज्यांच्या सेवनाचे आणि निसर्गाशी असलेल्या रोजच्या थेट संबंधांचे फळ आहे. शेवळी, कुरडू, लोत यांसारख्या रानभाज्या आणि जंगलातील नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर करून आयुष्य जगणार्या या माणसाने कधीही आधुनिक औषधांची गरज भासू दिली नाही. निसर्गाने दिलेल्या शरीराची काळजी निसर्गाच्याच अन्नाने घेणे, यापेक्षा मोठा कोणताही आरोग्याचा नियम असू शकत नाही, हा मोलाचा संदेश त्यांच्या जीवनशैलीतून मिळतो.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेल्या या कलाकाराची पावले मात्र आजही आपल्या वाळवंडे गावातील मातीशी तितकीच घट्ट जोडलेली आहेत. विमानाने दिल्लीला जाताना ढगांकडे बघून ‘सावरीच्या बोंडातून कापूस बाहेर पडावा, तसे ढग दिसतात’ अशी दिलेली उपमा, त्यांच्यात दडलेल्या एका संवेदनशील आणि निसर्गप्रेमी कवीची ओळख करून देते. पुरस्कार, प्रसिद्धी आणि मोठेपण मिळूनही त्यांच्यातील नम्रता, साधेपणा आणि प्रामाणिकपणा जराही कमी झालेला नाही.
‘आम्ही मोठे नाही, कला जपणारे तुम्ही मोठे आहात’ असे मानणार्या त्यांच्या चेहर्यावरचे हास्य हे खर्या अर्थाने लोककलेचे तेज दर्शवते. अशा दुर्मीळ रत्नाचा गौरव करणे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधून हा सांस्कृतिक ठेवा लोकांसमोर आणणे हे अत्यंत मोलाचे कार्य आहे. आज अनेक पारंपरिक लोककला आणि वाद्ये काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. डिजिटल युगाच्या आणि पाश्चात्त्य संगीताच्या आक्रमणात तारप्यासारखा नितांत सुंदर नाद कुठेतरी हरवून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
अशा वेळी, भिकल्या धिंडा यांच्यासारख्या कलाकारांचा सन्मान होणे आणि त्यांच्या कलेचे दस्तऐवजीकरण होणे ही काळाची गरज आहे. ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन आहे. भिकल्याजींसारख्या अवलिया कलाकारांच्या श्वासात जोपर्यंत तारपा गुंजत आहे, तोपर्यंत आपली लोकसंस्कृती अमर राहील, यात शंका नाही. गरज आहे ती फक्त या संस्कृतीचे संवर्धन करण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत हा अनमोल वारसा आत्मविश्वासाने पोहोचवण्याची.