खारघरमध्ये ज्वेलर्स दुकान फोडले; हिरे, सोन्याचे दागिने लंपास ; रोकडसह १.६४ कोटींचा ऐवज लंपास

By Raigad Times    12-Aug-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | खारघर सेक्टर-१२ येथील ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या चोरीमुळे परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, खारघर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
 
सीआयएसएफ रोडवरील उत्सव चौक परिसरातील साई कृपा प्रिमायसेस इमारतीत ‘कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्स’ हे दुकान आहे. १० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. मंगळवारी (११ ऑगस्ट) दुसर्‍या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता शटर उचकटल्याचे आणि दुकानातील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
 
चोरट्यांनी हत्याराच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यांनी ६८ लाख ९१ हजार ७७९ रुपयांचे १३९ हिर्‍यांचे दागिने, १५ लाख ५७ हजार ३७९ रुपयांचे २७ सोन्याचे दागिने, ७९ लाख ५५ हजार ८१७ रुपयांचे ४८ प्लॅटिनमचे दागिने आणि ३० हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. घटनेनंतर खारघर पोलिसांनी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी केली.
 
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीन सुधाकर वांदे यांच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.