विद्यार्थिनींनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे आग, प्रशासनाला आली जाग

कर्जत तालुक्यातील खांडपे कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

By Raigad Times    11-Aug-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील विद्यार्थिनीच्या व्हायरल व्हिडिओमुळे अक्षरशा सोशल मिडीयावर आग लावली. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या गावाकडे जाणार्‍या रस्त्याची झालेली वाताहात पत्रकारांच्या स्टाईलमध्ये समोर आणली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनीदेखील हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीयावरुन शेअर केला होता.
 
या विद्यार्थ्याची दखल घेत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरुवात केली आहे. खांडपे येथील ज्ञान मकरंद विद्यालय शाळेतील विद्यार्थी माध्यमिक विद्यालय सोडल्यानंतर आपल्या घरी चालत जात असतात. दररोजच्या खड्डेमय रस्त्याला कंटाळून शाळेतील मुलींनी छत्रीला बूम बनवत एक व्हिडिओ तयार केला. ज्योत्स्ना घारे ही विद्यार्थिनी आपल्या गावाच्या रस्त्याची बाजू रिपोर्टर म्हणून मांडत होती तर कॅमेरामन म्हणून मानसी पवार हिने जबाबदारी पार पाडली होती.
 
त्या मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओ बनवणार्‍या शालेय मुली या प्रसिद्धीचे झोतात आल्या आहेत. मात्र राज्य सरकार कडून या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला गेला असल्याचे बोलले जात होते. तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याबाबत चौकशी केली. सोमवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावर पडलेले खड्डे कमी करण्यासाठी जेसीबी मशीन यांचा वापर करण्यात आला.
 
ब्लेड मारून राहिलेलं खड्डे खडी जेएसबी खडी टाकण्यात आली आणि रोलर फिरवून रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्यावर मे महिन्यात खडी टाकून रस्ता दुरुस्त केला होता, पण पावसाळ्यात रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने रस्ता खराब झाला होता. चिंचवली - चांदई- कडाव - तांबस-जांबिवली- दहिवली - कोंदिवडे असा राज्यमार्ग रस्ता असून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मंजूर आहे. त्या ठिकाणचा रस्ता पावसाळ्यानंतर मजबूत केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे उपअभियंता राहुल देवांग यांनी दिली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे.