राफ्टिंग बोट उलटली, पर्यटकाचा मृत्यू; एक महिन्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा

By Raigad Times    11-Aug-2026
Total Views |
roha
 
रोहा | कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना बोट पाण्यातील झाडाला अडकून उलटल्याने नदीत पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी गावाच्या हद्दीत ११ जुलै रोजी घडली होती.
 
या दुर्घटनेप्रकरणी मयत व्यक्तीला वाचविण्यासाठी हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास धगडवाडी गावाच्या हद्दीतील कुंडलिका नदीपात्रात ही दुर्घटना घडली.
 
मयत व्यक्ती राफ्टिंग बोटीत बसून नदीत राफ्टिंग करीत असताना बोट पाण्यातील झाडाला अडकली आणि अचानक उलटली. यावेळी मयत व्यक्ती नदीच्या पाण्यात पडली. बोटीतील दोरी त्याच्या पायात अडकल्याने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या.
 
या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर कोलाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र तपासादरम्यान मयत व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात संबंधित दोघांकडून हलगर्जीपणा झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. या तपासाच्या आधारे कोलाड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोजकर करीत आहेत.