खारघरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांकडून पर्दाफाश

तीन महिलांची सुटका,व्यवस्थापकासह एकाला अटक

By Raigad Times    11-Aug-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | खारघर सेक्टर-७ येथील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केल्यानंतर केलेल्या कारवाईत देहव्यापारासाठी ठेवण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली.
 
या प्रकरणी स्पाच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना स्पामध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खारघर सेक्टर-७ येथील ‘ग्रेसफुल टच सलून अँड स्पा’ येथे बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मिळालेल्या संकेताची खात्री होताच पोलिसांच्या पथकाने स्पावर छापा टाकला.
 
कारवाईदरम्यान देहव्यापारासाठी ठेवण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. तपासात स्पाचा व्यवस्थापक आरिफ अजीज मन्सुरी (३५) याने बनावट ग्राहकाकडून ५ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पा मालक पूजा पटेल ऊर्फ झिनत दरबेज पटेल आणि आसिफ खान यांच्या संगनमताने महिलांना मसाजच्या नावाखाली स्पामध्ये ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.
 
या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाची जबाबदारी खारघर पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.
 
सहायक पोलीस आयुक्त शैलेशकुमार अंचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे तसेच पोलीस हवालदार पाटील, म्हात्रे, अडकमोल, हांडे आणि पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, पारसुर, आव्हाड, कोलते यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.