नवी मुंबईत सरसकट वाढीव एफएसआयला भाजपचा विरोध

भाजपचा महासभेत यूडीसीपीआरला विरोध नगरविकास धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा

By Raigad Times    11-Aug-2026
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरसकट वाढीव एफएसआय लागू करून बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडली. शहराची वहनक्षमता आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा शास्त्रोक्त अभ्यास करूनच भविष्यातील विकासाचे धोरण निश्चित करावे अशीही मागणी करण्यात आली.
 
वनमंत्री गणेश नाईक यांच्या समर्थक भाजप नगरसेवकांनी मांडलेल्या या भूमिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. वाढीव एफएसआय आणि क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांधकामे झाल्यास नवी मुंबईच्या नियोजनाचा समतोल बिघडून शहराचा विस्तार अनियंत्रित पद्धतीने होईल, असा आक्षेप भाजप नगरसेवकांनी घेतला.
 
यावेळी यूडीसीपीआर, समूह विकास योजना (क्लस्टर), गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि झोपडपट्टी पुनर्विकासामुळे नवी मुंबईच्या पायाभूत सुविधांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याचा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला. महापालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी सरसकट वाढीव एफएसआयला विरोध करताना, ‘वाढीव एफएसआयच्या माध्यमातून वाटेल तशी बांधकामे मंजूर करून नवी मुंबईचे ठाणे करू नका,’ अशी भूमिका मांडली.
 
शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, मलनिस्सारण, वीज, शाळा तसेच अन्य नागरी सुविधांची क्षमता तपासल्याशिवाय अतिरिक्त बांधकामांना परवानगी देणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.नवी मुंबईत सरसकट वाढीव एफएसआय लागू झाल्यास विद्यमान पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
 
त्यामुळे शहराची वहनक्षमता किती आहे, उपलब्ध सुविधांच्या तुलनेत किती अतिरिक्त लोकसंख्या स्वीकारता येईल आणि कोणत्या भागात किती बांधकामाला परवानगी देता येईल, याचे निकष निश्चित करण्याची गरज भाजप नगरसेवकांनी व्यक्त केली. दाटीवाटीच्या आणि पारंपरिक पद्धतीने पुनर्विकास करणे शक्य नसलेल्या भागात क्लस्टर योजना आवश्यक असल्यास ती राबविण्यास विरोध नाही. मात्र, संपूर्ण शहरासाठी सरसकट क्लस्टरचा आग्रह धरला जाऊ नये.
 
या योजनेचा फायदा केवळ विकासकांना होणार नाही, याचीही दक्षता घेणे आवश्यक असल्याचे भाजप नगरसेवकांनी सभेत स्पष्ट केले. दरम्यान, वाढीव एफएसआय आणि क्लस्टरच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटाचे नगरसेवक आमनेसामने आले. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असताना त्यावर नियंत्रण का आणले गेले नाही, असा सवाल शिंदे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना केला.
 
त्यामुळे महासभेत काही काळ राजकीय वातावरण तापले. ‘नवी मुंबईचे ठाणे होऊ देणार नाही’, अशी स्पष्ट भूमिका मांडताना सागर नाईक यांनी ठाण्यात ज्याप्रमाणे क्लस्टर योजना राबविली जात आहे, त्याच धर्तीवर नवी मुंबईत ती लादली जाऊ नये, असे सांगितले. विकासकामांच्या नावाखाली केवळ वाढीव एफएसआयचे वाटप करणे हे विकासाचे धोरण असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.