माणगाव | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडण्यामागे कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्याचे सांगितले होते. केंद्रीय मंत्रीच जर कोकणातील रस्त्याबाबत असे म्हणत असतील त, हे ठेकेदार कोणामुळे कंटाळून गेले? असा प्रश्न नाही का निर्माण होत, असा सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच प्रस्तावित तिसरी मुंबई आणि स्थानिकांच्या हातुन जाणार्या जमिनी यावर त्यांनी परखड मत व्यक्त केले.राज ठाकरे हे रविवारी (९ ऑगस्ट) रायगडच्या दौर्यावर होते. यावेळी पेण, माणगाव आणि पनवेल येथील पक्षाच्या कार्यालयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी केली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावरदेखील निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्याचे आपल्याला सांगितले होते; मात्र "कंत्राटदार का कंटाळले, याचा विचार केला पाहिजे,” असे म्हणत ठाकरे यांनी मूळ कारणांवर बोट ठेवले आहे. "मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पातील विविध टप्प्यांवर काम रखडल्याने रायगडसह संपूर्ण कोकणातील प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.
अनेक ठिकाणी अपूर्ण कामे, वाहतूक कोंडी, खड्डे आणि धोकादायक रस्त्यांमुळे प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे महामार्ग कधी पूर्ण होणार, हा प्रश्न कोकणवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात आज जमीन विकणे हाच सर्वात मोठा धंदा सुरु आहे,” असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील जमीनविक्री, वाढते शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली होणार्या जमिनींच्या व्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पूर्वी एखादा रस्त्या करायचे झाल्यास सरकारकडून आधी भूसंपादन केले जायचे त्यांनतर रस्त्याचे काम सुरु व्हायचे आता आधी टेंडर काढले जातात, कमिशन दिले जाते आणि मग भूसंपादन करण्यास सुरु होते. परिणामी कामे रखडून पडत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये महामार्ग, औद्योगिक वसाहती, विमानतळ आणि विविध विकास प्रकल्पांमुळे जमिनींच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
त्यातून जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारांना वेग आला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्येही जमिनींचे रूपांतर, भूखंड निर्मिती आणि विकास प्रकल्पांसाठी जमीन संपादनाचे प्रश्न सातत्याने चर्चेत असतात. या पार्श्वभूमीवर जमीनविक्रीकडे केवळ आर्थिक व्यवहार म्हणून न पाहता त्यामागील धोरण, स्थानिक नागरिकांचे हित आणि भविष्यातील नियोजन यांचा विचार करण्याची गरज असल्याचा मुद्दा ठाकरे यांच्या वक्तव्यातून पुढे आला आहे. रायगडातील पनवेल, पेण उरण परिसरात तिसरी मुंबई केली जात आहे मात्र, आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार.
चाटायचा आहे का असला विकास?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या विकासाचा स्थानिकांना उपयोग होणार नसेल तर उपयोग काय? असेही त्यांनी म्हटले आहे. कोकणातील जमिनींचे मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरु आहेत. नैसर्गिक साधनसंपत्ती, जमीन आणि पायाभूत सुविधांचा विकास करताना त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना कितपत मिळतो, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी आणि संसाधनांचा वापर होत असेल, तर त्या विकासाचा नेमका फायदा कोणाला होणार, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले.