रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसी बँकेचे कौतुक , बँकेचे हायटेक कामकाज पाहून वरिष्ठ अधिकारी प्रभावित

By Raigad Times    10-Aug-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. वित्तीय समावेशन, ग्रामीण भागातील बँकिंग सेवांचा विस्तार, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, आधुनिक बँकिंग व्यवस्था आणि सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धी या क्षेत्रांत बँकेने केलेल्या कामाची दखल घेत अधिकार्‍यांनी बँकेचे कौतुक केले.
 
रिझर्व्ह बँकेच्या डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशनचे जनरल मॅनेजर विकासकुमार साहू, असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय भासे आणि शैलेश इंगळे यांच्या शिष्टमंडळाने बँकेच्या मुख्य कार्यालयासह विविध सहकारी संस्थांना भेट दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे सादरीकरण केले. यावेळी नाबार्डच्या महाराष्ट्र रिजनल ऑफिसचे एजीएम नवल कन्नोर आणि बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे उपस्थित होते.
 
वित्तीय समावेशनाच्या क्षेत्रात रायगड डीसीसी बँकेने केलेल्या कामाची विशेष दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील उद्योजकता, स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योगांना बँकेने दिलेल्या आर्थिक पाठबळाचे विकासकुमार साहू यांनी कौतुक केले. जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक महिला बचतगटांशी बँकेने जोडलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांना दिलेले पाठबळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
रोजगारनिर्मितीच्या योजनांचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील कशेळे, मजगाव, नाते, विन्हेरे, विळे, राजपुरी, संदेरी यांसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये शाखांचा विस्तार करून बँकेने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत औपचारिक बँकिंग सेवा पोहोचवल्याची नोंद यावेळी घेण्यात आली.
 
ग्रामीण भागातील विविध घटकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा बँकेचा प्रयत्न हा वित्तीय समावेशनाचा प्रभावी नमुना असल्याचे साहू यांनी नमूद केले. सहकारी बँकांनी व्यवसायवृद्धीसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध बँकिंग सेवा देण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रायगड डीसीसी बँकेच्या ८ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायाचा तसेच सातत्यपूर्ण व्यवसायवृद्धीचा आढावा घेण्यात आला.
 
आधुनिक बँकिंग सेवा, डिजिटल परिवर्तन, जोखीम व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, ग्राहकाभिमुख सेवा आणि नियामक अपेक्षांनुसार विकसित करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी सुसंगतपणे बँकेने तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करण्याचा घेतलेला दृष्टिकोन प्रशंसनीय असल्याचे साहू यांनी सांगितले. सहकारी संस्थांचे संगणकीकरण ठरले मार्गदर्शक सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने राबविलेल्या विविध उपक्रमांचाही यावेळी विशेष उल्लेख झाला.
 
सहकारी संस्थांचे संगणकीकरण करून त्यांना आधुनिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी बँकेने घेतलेल्या पुढाकाराची रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांनी दखल घेतली. सहकारी संस्थांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या या उपक्रमातून सहकार क्षेत्रातील इतर संस्थांनाही दिशा मिळू शकते. बँकेने या क्षेत्रात उभे केलेले काम सहकार क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे साहू यांनी मत व्यक्त केले. या कामगिरीमागे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व, संचालक मंडळ व व्यवस्थापनाची दूरदृष्टी तसेच अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
....आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा अ‍ॅनालिटिक्स,डिजिटल गव्हर्नन्स, अधिक सक्षम सायबर सुरक्षा आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा बँकेचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वित्तीय समावेशनापासून सहकारी संस्थांच्या आधुनिकीकरणापर्यंत विविध क्षेत्रांत बँकेने केलेले काम देशातील सहकारी बँकांसाठी रोल मॉडेल ठरू शकते, असे मत विकासकुमार साहू यांनी व्यक्त करत रायगड डीसीसी बँकेचे अभिनंदन केले.