कर्जत | कर्जत तालुक्यातील जागतिक आदिवासी दिनाच्या मुख्य कार्यक्रमात कर्जतखालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांची पार्श्वभूमी असताना आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात त्यांची एकत्रित उपस्थिती लक्षवेधी ठरली.
कशेळे येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात दोन्ही नेते उपस्थित होते. कार्यक्रमातील भाषणादरम्यान सुधाकर घारे यांनी आपल्या भाषणात आमदार महेंद्र थोरवे यांचा नामोल्लेख केला. मात्र, आमदार थोरवे यांनी आपल्या भाषणात सुधाकर घारे यांचा नामोल्लेख टाळल्याने उपस्थितांमध्ये त्याची चर्चा रंगली.
त्यामुळे एकाच व्यासपीठावर आलेले दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या कितपत जवळ आले आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. विशेष म्हणजे, कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी कशेळे येथील आदिवासी भवन पुढील वर्षी ९ ऑगस्टपूर्वी खुले करण्यात येईल आणि याच दिवशी त्याचे दिमाखात उद्घाटन केले जाईल, अशी घोषणा केली. आदिवासी समाजासाठी हे भवन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान काही काळ आमदार थोरवे यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर नृत्य केले. त्यावेळी सुधाकर घारे व्यासपीठावरून खाली उतरले होते. प्रमुख मान्यवर रवाना झाल्यानंतरही आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
दरम्यान, जागतिक आदिवासी दिनानिमित्त नेरळपासून कर्जत मार्गे कशेळेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. हुतात्मा स्मारकांना आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रॅली कशेळेकडे रवाना झाली. पारंपरिक नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि आदिवासी वेशभूषेमुळे रॅलीला विशेष रंगत आली.
राजकीय संकेत काय?
कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर थोरवे आणि घारे यांची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती हा कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. घारेंकडून थोरवेंचा उल्लेख आणि थोरवेंकडून घारेंचा नामोल्लेख टाळला जाणे, यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय अंतर अद्याप कायम असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. मात्र, आदिवासी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर येण्यास सुरुवात झाल्याने कर्जतच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.