‘तिसरी मुंबई’विरोधात शेतकर्‍यांचा एल्गार ! १५ ऑगस्टला कोकण भवन येथे १२४ गावांतील शेतकर्‍यांचे लाक्षणिक उपोषण

By Raigad Times    10-Aug-2026
Total Views |
 uran
 
उरण | ‘तिसरी मुंबई’च्या नावाखाली उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांतील १२४ गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी तसेच गावांचे अस्तित्व धोक्यात आणले जात असल्याचा आरोप करीत एमएमआरडीए-केएससी नवनगरविरोधी समिती, रायगड यांच्यावतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील कोकण आयुक्त कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
 
या आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता चिरनेर हायस्कूल येथे हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. त्यानंतर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शेतकरी बेलापूरच्या दिशेने रवाना होतील. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोकण आयुक्त कार्यालयासमोर हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. ‘तिसर्‍या मुंबईला एक इंचही जमीन देणार नाही!’ असा निर्धार व्यक्त करीत शेतकर्‍यांनी सरकारला इशारा दिला आहे.
 
शेती, घरे, गाव, भाषा, संस्कृती आणि भूमिपुत्रांचे अस्तित्व वाचविण्यासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या जमिनींचे भवितव्य, गावांचे अस्तित्व आणि स्थानिकांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टच्या आंदोलनाला १२४ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे समितीने म्हटले आहे. ‘आपले भविष्य, आपली शेती; आपले घर आणि गाव वाचवण्यासाठी तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर आणि सरचिटणीस रूपेश पाटील यांनी केले आहे.