पनवेल | इस्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकर्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या व्यवहारातून बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पाच महिन्यांच्या तपासानंतर आरोपींना गोव्यातून अटक केली. करंजाडे येथील सर्वेक्षणक्रमांक ८१/२ मधील ४७ गुंठे जमीन नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम ऊर्फ सेलीम एलियाहू चिंचोलकर यांच्या नावावर होती. हे दोघेही इस्रायलमध्ये वास्तव्यास गेले होते.
नाथन यांचे २०११मध्ये, तर शालोम यांचे २०१६मध्ये निधन झाले. त्यांचे वारसदार सध्या इस्रायल आणि अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आरोपी सुरज वासुदेव शिंदे याला मिळाली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज शिंदे याने स्वतःच्या वडिलांना नाथन चिंचोलकर म्हणून, तर मेहुणा मनीष मनोहर मोरे याला शालोम चिंचोलकर म्हणून उभे केले.
त्यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून ही जमीन सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांना विकण्यात आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरज शिंदे कुटुंबीय व साथीदारांसह फरार झाला होता.