रोहा | मुसळधार पावसामुळे आणि भिरा जलविद्युत प्रकल्पातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे रोहा-अष्टमी शहर पुराच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल तीन वेळा पुराचे पाणी शहरात व नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
वीज-मोबाईल नेटवर्क खंडित झाले आहे. भरतीच्या वेळी पुन्हा पुराचे पाणी शहरात शिरेल, हे भीतीच्या सावट रोहेकरांवर आहे. कुंडलिका नदीच्या महापुरामुळे शहरातील अनेक सखल भागांसह नदीकाठावरील गावे पाण्याखाली गेली, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक कुटुंबांना घरातच अडकून राहावे लागले, तर काहींना काळोखात आणि पुराच्या भीतीत रात्र काढावी लागली.
महापुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दूध, किराणा, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी नागरिकांची कसरत आहे.पूरामुळे आंबिवली, धोत्रे, शिलार, अकॅडमी परिसर, किकवी, सुगवे, लोभेवाडी, अंतराट, गुडवण, चोरवले, पिंपळोली आदी गावांतील जनजीवन विस्कळीत झाले.
अनेक ठिकाणी पाणी शेतांमध्ये शिरल्याने भात लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावातील गाळ आणि माती शेतीमध्ये वाहून आल्याने भाताची रोपे चिखलाखाली गाडली गेली असून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आंबिवली बंधार्यातून आलेले पाणी वनविहार परिसरातील पांडवकालीन लेण्यांमध्येही शिरले. त्यामुळे ऐतिहासिक लेणी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून परिसरात पाण्याचा वेग कायम आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे आणि मदतकार्य सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.