नवी मुंबई | आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आज पनवेलमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विधिमंडळावर निघालेला महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची, घोषणाबाजी तसेच किरकोळ झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून होणार होती. तेथून विधिमंडळावर पायी मोर्चा नेण्याची तयारी आंदोलनकर्त्यांनी केली होती. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटा यांनी केले.
यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महानगरप्रमुख अॅड. समाधान काशिद, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी तत्काळ मान्य करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा मांडली. या आंदोलनाला महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा नव्हता.
त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही आंदोलनाच्या नेत्यांनी केला. शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका करत, "रायगडमध्ये यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. सर्व आंदोलनांना परवानगी मिळतेच असे नाही; मात्र यावेळी पोलिसांनी घेतलेली भूमिका दडपशाहीची असून ती लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील," असे सांगितले.
शिवसेना (ठाकरेगट) उपनेते बबनदादा पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारचा निषेध करत, "दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. पोलिसांची दडपशाही कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही," असा इशारा दिला. दरम्यान, मोर्चादरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणार्या रश्मिता पोपेटा यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मोर्चा रोखल्याने प्रकल्पग्रस्त आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून दि. बा. पाटील नामकरणाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.