महाडला पुन्हा पुराचा विळखा; तिसर्‍यांदा बाजारपेठ जलमय

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
mahad
 
महाड | महापुराच्या संकटातून सावरत असलेल्या महाड शहराला मिळालेला दिलासा अवघ्या काही तासांचाच ठरला. मंगळवारी दुपारनंतर पुराचे पाणी ओसरू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता.
 
मात्र मध्यरात्रीनंतर महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सावित्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आणि बुधवारी (८ जुलै) पहाटेच्या सुमारास महाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह सखल भागांमध्ये पुन्हा पुराचे पाणी शिरले.
 
गेल्या चार दिवसांत तिसर्‍यांदा महाड शहर पुराच्या विळख्यात सापडले आहे. पूराचे पाणी ओसरल्यानंतर व्यापार्‍यांनी दुकाने स्वच्छ करून चिखल व गाळ काढण्याचे काम सुरू केले होते. महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवत जंतुनाशक फवारणी केली होती. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली.
 
परिणामी, पहाटे मुख्य बाजारपेठ, तसेच शहरातील इतर सखल भागांमध्ये पुन्हा पूर शिरला. त्यामुळे दिवसभर परिश्रम घेऊन दुकाने स्वच्छ केलेल्या व्यापार्‍यांना पुन्हा एकदा माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ करावी लागली. वारंवार येणार्‍या पुरामुळे व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने सावित्री नदीची पाणीपातळी हळूहळू घटू लागली. तरीही शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचून होते.
 
दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने ओसरलेले पुराचे पाणी पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. महाबळेश्वरच्या उगम भागात अद्यापही पाऊस सुरू असल्याने महाडवरील पुराचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाड नगरपालिकेचे कर्मचारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
 
नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वारंवार येणार्‍या पुरामुळे महाडकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी, नागरिक आणि व्यावसायिक पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाल्याशिवाय महाडवरील पुराचे संकट दूर होणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.