महाडच्या मुख्याधिकार्‍यांना भाजप नगरसेवकांकडून मारहाण ; दोन नगरसेवकांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
mahad
 
महड | महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांना त्यांच्या दालनात घुसून भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीनंतर नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त करत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
बुधवारी (८ जुलै) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आपल्या दालनात शासकीय कामकाजात व्यस्त असताना, भाजपचे नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्ती त्यांच्या दालना शिरल्या. यावेळी प्रभाग ६ मधील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकार्‍यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
 
काही वेळातच हा वाद उग्र झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. नगरसेवक राकेश पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांच्या थप्पड मारून कमरेवर लाथ मारली तसेच शिवीगाळ केली. तर नगरसेवक सूरज बामणे यांनी हातातील छत्रीने मुख्याधिकार्‍यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार केला. त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने मुख्याधिकार्‍यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत छाती व पाठीवर हाताबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत तेथून पलायन केल्याचे मुख्याधिकारी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १३२, १२१(२), २२१, ३५९(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत.
 
दरम्यान, शासकीय अधिकार्‍यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या हल्ल्यामुळे महाड नगरपरिषदेत संतापाची लाट उसळली आहे. नगरपरिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला दिला आहे.