सडे गावावर दरडीचे संकट; १३ कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
poladpur news
 
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
 
या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर गावातील धोकादायक परिसरात राहणार्‍या १३ कुटुंबांतील ३७ नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे तात्पुरते स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषद अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, तहसीलदार कपिल घोरपडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश पवार, पोलादपूर पंचायत समिती विस्तार अधिकारी चिमाजी हंबीर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अविनाश कांबळे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, तलाठी सुनील वैराळे, ग्रामपंचायत अधिकारी विक्रम खुडे यांनी सडे गावाला भेट दिली. प्रशासनाकडून परिसरावर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.