स्मार्ट मीटर ऐच्छिकच ठेवा, सक्ती नको! वाढीव वीज बिले माफ करण्याची शेकापची मागणी

श्रीवर्धनमध्ये तहसीलदार व महावितरणला निवेदन; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | राज्यात महावितरणकडून सुरु असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला विरोध दर्शवत श्रीवर्धनमध्ये शेकापने तहसीलदार तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन दिले आले. स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक ठेवावे, ग्राहकांवरील सक्ती थांबवावी आणि वाढीव वीजबिले माफ करावीत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
 
तालुका चिटणीस विश्वास विलास तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा चिटणीस सदस्य दशरथ कातकर, सहचिटणीस अल्लादिन सनगे, लक्ष्मण पाटील, योगेश रीळकर, वसंत यादव, संदेश मोरे, गुलाबराव सोनवणे, विपीन पाटील, सचिन पुसाळकर, दिलीप सरदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविताना अनेक ठिकाणी वीज ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भविष्यात प्री-पेड स्मार्ट मीटर लागू करण्याचा विचारही सुरू असल्याने ग्राहकांमध्ये अधिकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेकापच्या मते, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
 
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मच्छीमार, लघुउद्योजक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा तसेच ग्राहकांना मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणी आणि त्यांच्या अधिकारांबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
 
यावेळी स्मार्ट मीटर बसविणे पूर्णपणे ऐच्छिक करावे, सक्तीने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे आलेली वाढीव वीजबिले माफ करावीत, सर्व तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय कोणताही निर्णय लागू करू नये, अशा प्रमुख मागण्या शेकापकडून करण्यात आल्या आहेत. शासनाने जनभावनांचा आदर करुन स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापने देण्यात आला.