रायगड-अलिबाग | पेण तालुयातील निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील कातकरी कुटुंबांना प्रशासनाने तातडीने मदतीचा हात दिला आहे. जखमींवर त्वरित उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आपदग्रस्तांना निवारा, अन्नधान्य व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.
सोमवारी (७ जुलै) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मलबा कातकरी कुटुंबांच्या घरांवर कोसळल्याने पाच कुटुंबे बाधित झाली. माहिती मिळताच महसूल, आरोग्य, आदिवासी विकास आणि वीज वितरण विभागासह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत गुलाब दशरथ वाघमारे, अविनाश काशिनाथ वाघमारे, जना काशिनाथ वाघमारे, निर्मला प्रकाश वाघमारे आणि प्रवीण वामन पवार यांच्या कुटुंबांचे नुकसान झाले.
जखमींना रायगड जिल्हा परिषद शाळा, कावजी येथे तात्पुरता निवारा देण्यात आला असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. शाळेतील वीजजोडणी तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणला निर्देश देण्यात आले असून, तोपर्यंत दोन सौर दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच आठ दिवस पुरेल इतका धान्यसाठाही आपदग्रस्तांना देण्यात आला आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पाहणीदरम्यान काही नागरिकांकडे आधारकार्ड, मतदार नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करून संबंधित कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.