अलिबाग | रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने अलिबाग येथे नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात दर्जेदार नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी (८ जुलै) विधानसभेत केले. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अलिबागसह चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर येथे प्रत्येकी नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच दर्जेदार नर्सिंग शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून, बाहेरील जिल्ह्यांमध्ये शिक्षणासाठी जाण्याची गरज कमी होणार आहे. याशिवाय मुंबई (जी.टी.), मुंबई (सेंट जॉर्जेस), धुळे, सोलापूर, अंबाजोगाई (बीड), अकोला, नागपूर (आयजीएमसी) आणि सांगली येथील आठ शासकीय जी.एन.एम. महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून तेथे प्रत्येकी १०० प्रवेश क्षमतेची शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच मुंबई (जे.जे.), नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील विद्यमान पाच शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासकीय संस्थांमध्ये नर्सिंग शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ४९१.९१ कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चास तसेच वार्षिक १२.५८ कोटी रुपयांच्या आवर्ती खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील नर्सिंग शिक्षणाची क्षमता लक्षणीय वाढणार असून, प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.