अलिबाग-खानाव पुलाला पडलेल्या भगदाडात पडून वृध्दाचा मृत्यू ; अलिबाग-खानाव पुलाला पडलेल्या भगदाडात पडून वृध्दाचा मृत्यू

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | अलिबाग-रोहा मार्गावरील खानावजवळील पुलाला पडलेल्या भगदाडात पडून एका ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चांगू घरत (वय ६५, रा.वेलवली-खानाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मृताच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
 
चांगू धरत हे बुधवारी (८ जुलै) सकाळी पुलावरून जात असताना पुलाला पडलेल्या भगदाडातून खाली पडले. त्यांचा मृतदेह पुलालगतच्या शेतात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मोठ्याप्र्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पुलाला बराच काळ भगदाड पडलेले होते. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या.
 
त्यामुळे हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याबाबत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता दिनेश पराते यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर विभागाच्यावतीने मृताच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.
 
या आश्वासनानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरही नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्च होऊनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्ता आणि पुलाची वेळेत दुरुस्ती झाली असती, तर चांगू धरत यांचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह, उपसरपंच निलेश गायकर, अ‍ॅड.राकेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेतली.