पाताळगंगेतून वाहून गेले तब्बल तीन हजार गॅस सिलेंडर ; सिलेंडर पकडण्यासाठी नदीकाठी नागरिकांची झुंबड

By Raigad Times    09-Jul-2026
Total Views |
pen
 
पेण | गेल्या महिन्यापर्यंत गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करणार्‍या नागरिकांना बुधवारी एक वेगळेच दृश्य पहायला मिळाले. पातळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या प्रवाहात हजारो एलपीजी गॅस सिलेंडर वाहत येत असल्याचे दिसताच महापुराची भीती विसरुन अनेकांनी ते पकडण्यासाठी नदीत उड्या मारल्या, तर काही जण होड्यांच्या सहाय्याने सिलेंडर गोळा करताना दिसले.
 
या प्रकारामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये एकच गोंधळ उडाला. पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएलच्या पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे अंदाजे तीन हजार गॅस सिलेंडर बुधवारी (८ जुलै) दुपारी नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
 
यामध्ये काही सिलेंडर भरलेले तर काही रिकामे असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेले हे सिलेंडर पेण तालुक्यातील खारपाडा, रावे, दादर, जिते, उर्नोली आदी गावांच्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसून आले. नदीत वाहत येणारे सिलेंडर किनार्‍यावर आणण्यासाठी अनेक स्थानिकांनी पोहत नदीत प्रवेश केला, तर काहींनी होड्यांचा आधार घेत सिलेंडर पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नदीकाठच्या अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
 
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले. नदीत किंवा परिसरात असे सिलेंडर आढळल्यास ते स्वतःजवळ न ठेवता एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरक, तहसीलदार कार्यालय (खालापूर किंवा पेण) अथवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.