मुसळधार पावसात थरार;दिघी खाडीत डिंगी पलटली

‘दिघी क्वीन’च्या चालकाने वाचवला तिघांचा जीव

By Raigad Times    06-Jul-2026
Total Views |
borlipanchatan
 
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील दिघी खाडीत थरारक घटना समोर आली आहे. या खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची फायबरची डिंगी मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे अचानक पलटी झाली. ‘दिघी क्वीन’ जंगल जेट्टीचे चालक बाळकृष्ण पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत तिघांचा जीव वाचवला.
 
हरिश्चंद्र नारायण भुणेश्वर, कृष्णा लखमा पाटील आणि प्रकाश पांडुरंग झेंगर हे तिघेही दिघी येथील रहिवासी आहेत. रविवारी, ५ जुलै रोजी ते फायबरच्या छोट्या डिंगी (होडी) तून रोजच्याप्रमाणे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र अचानक मुसळधार पाऊस आणि वेगवान वार्‍यामुळे समुद्र खवळला आणि त्यांच्या डिंगीने तोल जाऊन पलटी घेतली. डिंगी उलटताच तिन्ही मच्छिमार समुद्रात फेकले गेले.
 
लाईफ जॅकेट किंवा अन्य सुरक्षासाधने नसल्याने त्यांच्यासमोर जीव वाचवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी किनार्‍याकडे पोहत जाण्याचा प्रयत्न सुरू केला. ही बाब दिघी जलवाहतूक सोसायटीच्या ‘दिघी क्वीन’ जंगल जेट्टीचे चालक बाळकृष्ण पाटील (रा. कुडगाव) यांच्या नजरेस आली. बाळकृष्ण यांनी क्षणाचाही विलंब न लावता बोट घटनास्थळाकडे वळवून बचावमोहीम सुरू केली.
 
समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता त्यांनी तिन्ही मच्छिमारांना एकामागोमाग सुरक्षितपणे बोटीत घेतले आणि किनार्‍यावर आणले. यानंतर त्यांना सुखरुप घरी रवाना करण्यात आले. बाळकृष्ण पाटील यांच्या प्रसंगावधामुळे तीन कुटुंबांवरील मोठे संकट टळले. स्थानिक नागरिकांनी तसेच मच्छिमार बांधवांनी बाळकृष्ण पाटील यांच्या धाडसाचे, तत्परतेचे आणि प्रसंगावधानाचे मनापासून कौतुक केले आहे.