अलिबाग | गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोकणाला अक्षरशा झोडपून काढले. मात्र २७ प्रमुख नद्यांपैकी २३ नद्या अजूनही इशारा पातळीखाली वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी या चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रोहा येथील कुंडलिका नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. या नदीची इशारा पातळी २३ मीटर असताना रविवारी (५ जुलै) पाणीपातळी २३.९५ मीटर नोंदविण्यात आली आहे. नागोठणे येथील अंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीची इशारा पातळी ८ मीटर असताना पाणी ९.२० मीटरपर्यंत वाढले असून ती ९ मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे.
महाडच्या सावित्री नदीनेही रविवारी इशारा पातळी ओलांडली आहे. तर पनवेलमधील पाताळगंगा नदीची पातळी २१.३५ मीटरपर्यंत पोहोचली असून ती २१.५२ मीटरच्या धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ आली आहे.हवामान विभागाने कोकणात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने प्रशासनाने नदीपात्रांवर आणि पूरप्रवण भागांवर चोवीस तास लक्ष ठेवले आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, पूल व बंधार्यांवर गर्दी करु नये तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणातील बहुतांश नद्या नियंत्रणात असल्या तरी रायगड आणि रत्नागिरीतील चार नद्यांमधील वाढती पाणीपातळी प्रशासनासाठी सतर्कतेचा इशारा ठरत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आल्या आहेत.
सहा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
रायगड जिल्ह्यांतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ५.१२ टीएमसी क्षमतेचा हेटवणे मध्यम प्रकल्प सध्या ३२.८२ टक्के भरला असून जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
उर्वरित प्रकल्पांतील पाणीसाठाही सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्याच्या जलसुरक्षेला बळ मिळत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावाना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.