अलिबाग | अलिबाग तालुक्यातील चरी मंडळ अधिकारी यांना पोयनाड पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अटकेची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करत महसूल कर्मचारी संघटनेने शनिवारी ‘लेखणी बंद आंदोलन’ केले तर आज सोमवारी (२७ जुलै) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा येणार आहे.
शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांनी फेरफार नोंदींमधून शाह यांचे नाव वगळले किंवा रद्द केले. परिणामी, वास्तविक खरेदीदाराचा अधिकार नाकारत मूळ खातेदारांच्या नावावर भूसंपादनाचा मोबदला मंजूर करण्यात आला आहे. याच प्रक्रियेत ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांचा मोबदला मूळ खातेदार आणि मृत व्यक्तीच्या नावावर वितरित करण्यात आल्याचा आरोप शहा यांनी तक्रारीत केला आहे.
तसेच, मृत सुमन पाटील यांचे नाव ७/१२ उतार्यावर कायम ठेवणे, फेरफार नोंदींमध्ये दिशाभूल करणारे बदल करणे आणि सरकारी अभिलेखांमध्ये छेडछाड करुन शासनासह तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे. शहा यांच्या तक्रारीवरुन पोयनाड पोलीस ठाण्यात, मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव, तलाठी सतिश भानुदास ढवळे, मूळ जमीनधारक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील मध्यस्थ कुमार नारायण बैकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी मंडळ अधिकारी जाधव यांना अटक केली आहे. मात्र, मंडळ अधिकार्यांवरील अटकेची कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप महसूल अधिकारी व कर्मचार्यांनी केला आहे. या प्रकरणातन्याय मिळावा, अटकेची कारवाई मागे घ्यावी आणि संबंधित अधिकार्यांवरील कारवाईचा फेरविचार करावा, या मागण्यांसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.