शहापूर एमआयडीसी भूसंपादन प्रक्रिया , मोबदला वाटपात ४३ लाखांची अफरातफर?

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; चरी सर्कल अटकेत , फेरफार बदलून मोबदला देताना मूळ खरेदीदाराला डावलल्याचा आरोप

By Raigad Times    26-Jul-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील भूसंपादन प्रकरणात महसूल यंत्रणेतील फेरफार नोंदींमध्ये झालेली छेडछाड आणि सुमारे ४३.१५ लाखांच्या भूसंपादन मोबदल्याच्या अनधिकृत वितरणाचा गंभीर समोर आला आहे.
 
या प्रकरणी चरी मंडळ अधिकार्‍यासह पाच जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडल अधिकारी रविदास सदुसिंग जाधव यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील व्यावसायिक किशोर रतिलाल शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मौजे शहापूर येथील सर्व्हे क्रमांक ४१४/१, ४१४/३, ४२८/४/अ आणि ४२८/४/ब या जमिनी मूळ मालक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील आणि सुमन किसन पाटील यांच्याकडून विधिवत साठेखत व खरेदीखताद्वारे विकत घेतल्या होत्या.
 
या व्यवहारासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची आवश्यक परवानगीही घेण्यात आली होती. तक्रारीनुसार, विस्तारित शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फेरफार नोंदींमधून शाह यांचे नाव वगळले किंवा रद्द केले. परिणामी, वास्तविक खरेदीदाराचा अधिकार नाकारत मूळ खातेदारांच्या नावावर भूसंपादनाचा मोबदला मंजूर करण्यात आला.
 
याच प्रक्रियेत ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांचा मोबदला मूळ खातेदार आणि मृत व्यक्तीच्या नावावर वितरित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, मृत सुमन पाटील यांचे नाव ७/१२ उतार्‍यावर कायम ठेवणे, फेरफार नोंदींमध्ये दिशाभूल करणारे बदल करणे आणि सरकारी अभिलेखांमध्ये छेडछाड करून शासनासह तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोयनाड पोलीस ठाण्यात, मंडल अधिकारी रविदास सदुसिंग जाधव, तलाठी सतिश भानुदास ढवळे, मूळ जमीनधारक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील मध्यस्थ कुमार नारायण बैकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.