अलिबाग | मंडल अधिकारी रविदास जाधव यांच्या अटकेनंतर महसूल विभागातील वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करीत संतप्त महसूल कर्मचार्यांनी शुक्रवारी (२४ जुलै) दुपारनंतर कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले.
या प्रकरणात योग्य आणि सकारात्मक कारवाई न झाल्यास २७ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही तलाठी संघटनेने दिला आहे.अलिबागचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया ७/१२ उतार्यावरील नोंदींच्या आधारे करण्यात आली होती. संबंधित तक्रारदाराने त्यावेळी कोणतीही हरकत अथवा दावा दाखल केला नव्हता.
त्यामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या महसूल नोंदींनुसार मूळ खातेदारांना मोबदला वितरित करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महसूल विभागातील वर्ग- ३ चे अधिकारी रविदास सदुसिंग जाधव (मंडल अधिकारी) व सतीश भानुदास ढवळे (ग्राम महसूल अधिकारी, शहापूर) यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रविदास जाधव यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता पोयनाड पोलिसांनी थेट अटक केली.
ही कारवाई एकतर्फी असून दबावतंत्राचा अवलंब करून करण्यात आल्याचा आरोप महसूल कर्मचार्यांनी केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या शासकीय कर्मचार्याने शासकीय कामकाजात हलगर्जीपणा अथवा त्रुटी केली असल्यास त्याच्यावर विभागीय कारवाई करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे. तसेच सर्वो च्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये थेट अटक न करता प्रथम चौकशीची नोटीस देणे बंधनकारक आहे.
असे असताना पोलिसांनी थेट अटक करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसुली अपिलीय प्रक्रियेचा अवलंब न करता थेट पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करून कर्मचार्यांना तत्काळ अटक करण्याचा पायंडा पाडला जात असल्याने महसूल कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. रविदास जाधव यांच्या अटकेचा जिल्हाधिकारी स्तरावर फेरविचार करून पोलीस अधीक्षक, रायगड यांना तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित गुन्हा तात्काळ रद्द करून रविदास जाधव यांची मुक्तता करावी आणि ग्राम महसूल अधिकारी सतीश भानुदास ढवळे यांना अटक करु नये, अशीही मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी व महसूल सेवक २७ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील. या आंदोलनामुळे निर्माण होणार्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा तलाठी संघाचे रायगड जिल्हा प्रभारी अध्यक्ष संजय शिंगे, प्रभारी सरचिटणीस किरण जुईकर यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.