बत्ती गुल| मोबाईलच्या टॉर्चवर महिलेची प्रसूती , सुधागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

आई, बाळ सुखरुप; डॉक्टरांचे कौतुक

By Raigad Times    26-Jul-2026
Total Views |
pali
 
पाली | सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज अचानक गेल्याने, मोबाईलच्या टॉर्चवर एका महिलेची प्रसूती करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. वैद्यकीय पथकाने कौशल्य पणाला लावून महिलेची यशस्वी प्रसुती केली. आई व बाळ दोन्ही सुखरुप आहेत.
 
जांभूळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ वर्षीय रोहिणी रवी वाघमारे यांना शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी ९ वाजता प्रसूती वेदना सुरु झाल्याने दाखल करण्यात आले. १० वाजल्यापासून केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातच आरोग्य केंद्रातील सौरऊर्जा यंत्रणाही बंद पडल्याने प्रसुतीगृहात अंधार पसरला. आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली. अशा वेळी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने हार न मानता तीन मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात दुपारी पावणेदोन वाजता महिलेची यशस्वी प्रसूती केली.
 
नवजात बाळाचे वजन २ किलो ४०० ग्रॅम असून आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. ही यशस्वी प्रसूती वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता म्हात्रे, डॉ. तुषार म्हेत्रे, आरोग्य सहाय्यक सविता रणखांबे, समुदाय आरोग्य अधिकारी सूरज कडू, आरोग्य सेविका अनुष्का थाले, आशा सेविका ज्योत्स्ना शिंदे आणि स्त्री परिचारिका कल्पना महाजन यांच्या समन्वयातून पार पडली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे कौतुक होत आहे.
 
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये अखंडित वीजपुरवठा आणि कार्यक्षम बॅकअप व्यवस्था असणे अपेक्षित असताना, डॉक्टरांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करावी लागणे ही गंभीर बाब मानली जात आहे.