कर्जत | गेली तीन दिवस नेरळ गाव आणि परिसरात वीजपुरवठा खंडित झाली होती. त्यामुळे नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत. शेवटी वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेरळ येथे पोहचले.
जोवर नेरळमधून वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर महावितरणच्या अधिकार्यांनी नेरळमधून निघून जाऊ नये, अशा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकार्यांना दिला आहे. नेरळ गाव आणि परिसर तीन दिवसापासून विजेअभावी अंधारात असल्याने वीज ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत. शुक्रवारी (२४ जुलै) संतप्त वीज ग्राहक यांनी सकाळी थेट महावितरण कार्यालय गाठले. नव्याने निर्माण झालेली सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला.
आमदार महेंद्र थोरवे यांनीही नेरळला भेट देऊन वीज ग्राहक यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार थोरवे यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आणि अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. कर्जतचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांना नेरळमध्ये येऊन तत्काळ सर्व माहिती घ्यावी आणि उपाययोजना करावी, अशी सूचन केली. वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकार्यांनी नेरळ सोडायचे नाही असे निर्देश आ.थोरवे यांनी दिले. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण कामाला लागले आणि नेरळ परिसरात वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकार्यांकडून देण्यात आले आहे. यावेळी माजी सभापती अमर मिसाळ, किसन शिंदे, विशाल साळुंखे, रंजन दातार आदी उपस्थित होते.