रोहा | रोहा-अष्टमी नगरपरिषदेत प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. घरकुल योजनेतील एका लाभार्थ्याला वापर परवाना देण्यास विलंबावरुन नगरसेवक महेश कोलाटकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला. यावेळी झालेल्या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हे प्रकरण इतके तापले की पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. शेवटी हे प्रकरण रोहा पोलिसांत पोहचले असून कोलाटकर पितापुत्राि वरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरकुल योजनेतील लाभार्थ्याचा वापर परवाना जाणूनबुजून रखडविण्यात येत असून तो मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांकडून लाचेची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक महेश कोलाटकर यांनी केला.
सर्वसामान्य नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवली जात असून नागरिकांना वारंवार नगरपरिषद कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणावरून काही नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी लाचखोरीचा आरोप झाल्याने कर्मचारी नाराज झाल्याचे पहायला मिळाले. हा वाद वाढत असल्याचे लक्षात येताच अखेर नगरपरिषद कार्यालयात पोलिसांना पाचारण करावे लागले.
या घटनेनंतर नगरपरिषदेतील कनिष्ठ अभियंता संजय देवदास वेरे यांनी नगरसेवक महेश कोलाटकर आणि त्यांचा मुलगा सिद्धेश यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घरकुल योजनेतील संबंधित लाभार्थ्याची आवश्यक कागदपत्रे अद्याप पूर्ण नाही, ती प्राप्त होताच वापर परवाना देण्यात येईल, असे सांगितल्यानंतरही कोलाटकर पिता-पुत्राने शिवीगाळ, मारहाणीचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान "मी जनतेची कामे करणारा नगरसेवक आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवत राहणार असून कितीही अडचणी आल्या तरी मागे हटणार नाही,” अशी भूमिका महेश कोलाटकर यांनी व्यक्त केली. तसेच घरकुल वापर परवाना देण्यासाठी संबधीत अधिकार्यांनी लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.