दिल्ली लाठीचार्जचे रायगडात पडसाद! अलिबाग, पेण, पनवेल, कर्जतमध्ये निदर्शन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा काँग्रेस, शेकापसह विविध संघटनांकडून निषेध

By Raigad Times    23-Jul-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | राजधानी दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळाला.
 
दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अलिबाग, पेण, पनवेल आणि कर्जत येथे विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) नेतृत्वाखाली चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृह मैदानावर आंदोलन करण्यात आले. शेकापच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
यावेळी सोनम वांगचुक यांच्यासह विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत दिल्लीतील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. पेण येथे काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत नीट परीक्षेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
 
पनवेलमध्येही युवक आणि विविध संघटनांनी आंदोलन करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. तर कर्जतमध्ये विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
 
कर्जत, नेरळसह जिल्ह्यातील या आंदोलनांमधून नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात उभारलेल्या या निदर्शनांमुळे हा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीबरोबरच राज्य आणि जिल्हास्तरावरही अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.