काळी छाया, जुने काळे डाग

By Raigad Times    23-Jul-2026
Total Views |
sampadakiya
 
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा भूभाग हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, ऐतिहासिक वारशासाठी आणि शांतताप्रिय संस्कृतीसाठी जगभरात ओळखला जातो. परंतु, याच समुद्रकिनार्‍याच्या सुरक्षेला आणि शांततेला गेल्या काही दशकांत वारंवार देशविघातक तसेच समाजविघातक कृत्यांचे ग्रहण लागले आहे. अलीकडेच श्रीवर्धन पोलिसांनी केलेली ३४ लाखांहून अधिक मूल्याच्या चरसची जप्ती आणि एका ६३ वर्षीय संशयिताची झालेली अटक ही केवळ एका गुन्हेगारी कारवाई पुरती मर्यादित नसून, या घटनेने पुन्हा एकदा कोकणातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
 
या प्रकरणातील मुख्य आरोपी सादिक इब्राहिम शेकदरे हा श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी या गावातील आहे. शेखाडी हे नाव ऐकताच १९९३ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या काळ्याछाया आणि त्या प्रकरणातील दाऊद इब्राहिम गँगचा म्होरक्या मोहम्मद दासा याच्यासह स्फोटके लपवण्याच्या काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती डोळ्यांसमोर उभी राहते. इतिहासाची ही पाने पुन्हा एकदा उघडली गेल्यामुळे आणि या गावाचे नाव एका नवीन परंतु अत्यंत गंभीर अशा अमली पदार्थांच्या तस्करीत आल्यामुळे केवळ कोकणातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.
 
श्रीवर्धन पोलिसांनी अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे श्रीवर्धनआरावी मार्गावरील कोंडीवली स्मशानभूमीजवळ रचलेल्या सापळ्यात सादिक शेकदरे याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान आणि नंतर त्याच्या घरातून तब्बल ६ किलो १९६ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ३४ लाख १८ हजार रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. एका ६३ वर्षांच्या व्यक्तीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त होणे आणि तो विनासायास बाळगणे, हे दर्शवते की या गुन्हेगारी जाळ्याचे मूळ किती खोलवर रुजलेले आहे.
 
हे केवळ एका किरकोळ तस्कराचे काम नसून, यामागे मोठी आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यीय सिंडिकेट असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असला तरी, या घटनेने समाजासमोर अनेक अनुत्तरित प्रश्न उभे केले आहेत.
 
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वेदनादायी आणि चिंतनीय बाब म्हणजे शेखाडी या गावाचा झालेला पुनरुच्चार. तिशी-पस्तीस वर्षांपूर्वी, म्हणजेच १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले होते आणि हजारो जखमी झाले होते. या महाविनाशामागील स्फोटके, आरडीएक्स आणि शस्त्रे कोकणातील याच किनारपट्टीवरून समुद्राच्या मार्गाने महाराष्ट्रात उतरवण्यात आली होती.
 
त्यावेळी रायगड जिल्ह्यातील शेखाडी गावाचे नाव या देशद्रोही कटाचे मुख्य केंद्र म्हणून देशपातळीवर झळकले होते. दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी आणि तस्करांनी याच परिसराचा गैरफायदा घेऊन देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावला होता. त्या काळापासून शेखाडी हे गाव गुप्तचर यंत्रणांच्या आणि सुरक्षा दलांच्या रडारवर आले होते. आता, तीन दशकांनंतर पुन्हा एकदा त्याच शेखाडी गावातून अमली पदार्थांची इतकी मोठी खेप जप्त होणे, हे या प्रदेशावर लागलेला जुना कलंक अजूनही पुसला गेलेला नाही किंवा तिथली गुन्हेगारी मानसिकता अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेली नाही, याचेच द्योतक मानले जात आहे.
 
अमली पदार्थांचे जाळे आज देशातील तरुणाईला आणि भावी पिढीला वाळवीसारखी पोखरून टाकत आहे. पूर्वी मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांपुरते मर्यादित असलेले हे लोण आता ग्रामीण भागात आणि विशेषतः किनारपट्टीच्या शांत गावांपर्यंत पसरत चालले आहे. कोकण किनारपट्टीचा वापर अवैध तस्करीसाठी वारंवार केला जात असल्याचे इतिहास सांगतो. कधी सोने आणि चांदीची तस्करी, कधी एकेकाळी शस्त्रास्त्रांची आयात, तर आता अमली पदार्थांचा विळखाया सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट होते कि या भागातील समुद्रकिनारे आणि निर्जन रस्ते तस्करांसाठी सुरक्षित मार्ग बनले आहेत.
 
स्थानिक पातळीवर अशा देशविघातक आणि समाजविघातक शक्तींना मिळणारे आश्रयदाते किंवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चालणारे हे काळे धंदे रोखण्यासाठी आता केवळ स्थानिक पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून चालणार नाही, तर यंत्रणांना अधिक आक्रमक व्हावे लागेल. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंदर गरड आणि त्यांच्या पथकाने अत्यंत धडाडीने ही कारवाई पार पाडली आहे आणि याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल. पोलीस अधीक्षक अनिल पारस आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जी सतर्कता दाखवली, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे विषारी पदार्थ समाजात पसरण्यापूर्वीच जप्त करण्यात यश आले.
 
परंतु, प्रश्न असा उपस्थित होतो की, हा माल आला कुठून आणि कुणापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन होता? सादिक शेकदरे हा केवळ मोहरा आहे का, यामागचा खरा सूत्रधार कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर या नेटवर्कचे मूळ उखडून काढले नाही, तर आज ३४ लाखांचा माल पकडला गेला, उद्या कोट्यवधी रुपयांचा माल पुन्हा या किनारपट्टीवरून सर्रास फिरू शकतो.
 
अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी ही केवळ आर्थिक उलाढालीची बाब नाही, तर यातून मिळणारा काळा पैसा अनेकदा दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो, असा गुप्तचर यंत्रणांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे या ड्रग्ज तस्करीच्या मुळाशी असणार्‍या आर्थिक आणि गुप्त नेटवर्कचा पर्दाफाश करणे ही केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याची नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेची गरज बनली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर केवळ सागरी सुरक्षेचे ढोंग करून चालणार नाही, तर किनारपट्टीवरील प्रत्येक वाडीवस्तीवर, गावागावात गुप्तचर यंत्रणांचे जाळे बळकट करावे लागेल.
 
स्थानिक पातळीवर राजकारणाचा किंवा दबावाचा आधार घेऊन अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणारी कोणतीही व्यवस्था नष्ट करावी लागेल. जर काहींचे हात जुन्या काळ्या कृत्यांशी जोडलेले असतील आणि आता तेच लोक नवीन पिढीला उद्ध्वस्त करण्यासाठी अमली पदार्थांच्या विळ्यात अडकवत असतील, तर त्यांच्यावर अत्यंत कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. सादिक शेकदरे याच्या पाठीमागे कोण आहेत, याचा तपास करताना पोलिसांनी राजकीय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. या प्रकरणाचा तपास जितक्या लवकर आणि गांभीर्याने तार्किक शेवटापर्यंत नेला जाईल, तितकाच कोकण किनारपट्टीचा आणि राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित होईल.