खालापूर | शेकापचा वर्धापन दिन सोहळा यावर्षी खालापूर येथे होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी होणार्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला असून, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले आहे.
वर्धापन दिन सोहळ्याच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला जिल्हा चिटणीस शिवानी जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते रामचंद्र देशमुख, तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष पाटील, भूषण कडव, प्रविण लाले, खोपोली शहरातील राजू अभाणी, जितेंद्र रावळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. खालापूर तालुक्याला यजमानपद मिळाल्याने उत्साह शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे यजमानपद यंदा खालापूर तालुक्याला मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालापूर तालुका, खोपोली शहर तसेच खालापूर नगरपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमस्थळी आसन व्यवस्था, वाहन पार्किंग, भोजन व्यवस्था यासह विविध कामांसाठी समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांवर जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत.