मुंबई | कोकणातील महायुतीचे दोन नेते माजी मंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गटारापासून सुरु झालेला हा वाद मर्कटलीलांपर्यंत पोहचला आहे. त्यातच आता कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनीही आता उडी घेतली आहे.
तटकरेंना पुढची लोकसभा कदाचित लढवायची नसावी, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.कोकणात सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यात जोरदार वाद सुरु आहे. याबाबत पत्रकारांनी रामदास कदम यांचे पुत्र तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना छेडले असता त्यांनी तटकरेंवर निशाणा साधला.
तटकरे आणि कदम हे दोन मोठे नेते आहेत, या दोन नेत्यांमध्ये मी बोलणं योग्य नाही; मात्र मी बोलायला लागलो तर सुनील तटकरे यांचे पितळ उघडे पडेल, असा गर्भित इशारा योगेश कदम यांनी दिला आहे. कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना आमची गरज नसावी. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते पाहता आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही, असेही कदम यांनीम्हटले आहे.
सुनील तटकरे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले, निवडणुकीत साथ दिली, मात्र त्याची जाणीव ठेवली नाही असे म्हणतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती. "ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद करण्याचे काम तटकरे करतात,” असा आरोप करतानाच त्यांनी ‘एहसान फरामोश’ असे म्हटले होते.
तसेच "गटारात दगड टाकून पाणी उडवून घ्यायचे नव्हते, तर माझ्या दारात कशाला आलात?” असा सवालही कदम यांनी केला होता. रामदास कदम यांच्या आरोपांना खासदार सुनील तटकरे यांनीही तितक्याच आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. कदम यांनी आपल्या दिवंगत वडिलांचा उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना "माझ्या वडिलांचे १९८४ मध्ये निधन झाले. त्यावेळी माझे वय २९ वर्षे होते.
त्यांच्या संदर्भाचा उल्लेख करण्याची कोणतीही गरज नव्हती,” असे तटकरे यांनी म्हटले होते. यानंतर, "पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो” अशी टीका तटकरेंनी केली होती. एकनाथ शिंदे यांना आपण रामदास कदम यांच्यासाठी ठाण्यातील रुग्णालयात एखादी खाट राखून ठेवण्यास सांगणार असल्याची उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. ‘आधीच मर्कट त्यात दारु प्यायले’ असे म्हणत तटकरेंनी कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला होता.
सुनील तटकरे, रामदास कदम यांच्यातील शाब्दीक संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. त्यातच योगेश कदम यांनी आता कोणतेही कॉम्प्रमाईज करण्यासाठी जागाच उरली नाही असे सांगितल्यामुळे हे राजकीय युद्ध आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.