नवी मुंबई | ऐरोली परिसरात राहणार्या ४० वर्षीय महिलेने विवाहबाह्य संबंधांमुळे पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तब्बल ११ महिन्यांनंतर उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले असून, आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,९ ऑगस्ट २०२५ रोजी ही घटना घडली होती. आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने झोपेत असलेल्या पतीचा प्रथम गळा आवळून खून केला. त्यानंतर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्याचा कोणालाही संशय येऊ नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने आरोपींनी मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यानंतर ते चादरीत गुंडाळून रात्रीच्या अंधारात घनदाट जंगलात नेऊन फेकून दिले. या घटनेनंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून आणि उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळाले.
गेल्या आठवड्यात, १३ जुलै रोजी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली. या निर्घृण हत्येमागील नेमका हेतू, आरोपींनी गुन्ह्याचे नियोजन कशा प्रकारे केले, तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कशा पद्धतीने केला, याबाबतचा सविस्तर तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.