वारी : महाराष्ट्राची चिरंतन आध्यात्मिक अस्मिता

By Raigad Times    19-Jul-2026
Total Views |
lekh
 
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा किंवा चालत जाण्याचा प्रवास नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि मानवी भावनेचा एक जिवंत प्रवाह आहे. गेल्या हजार वर्षांहून अधिक काळ, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने पावले टाकत आहेत.
 
या प्रवासात तहान-भूक विसरून, ऊन-पावसाची पर्वा न करता, केवळ विठ्ठल या एकाच ध्यासाने चालणारा वारकरी हा या परंपरेचा मूळ आधार आहे. ही वारी काळाच्या ओघात अनेक आक्रमणे, राजकीय स्थित्यंतरे आणि सामाजिक बदलांतून गेली, पण तिची मूळ प्रेरणा आजही तितकीच शुद्ध आणि प्रबळ राहिली आहे. ऐतिहासिक पुराव्यांच्या दृष्टीने पाहिले तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नसून ते एक ऐतिहासिक केंद्र आहे.
 
पंढरपुरात सापडलेले ताम्रपट आणि शिलालेखांचे पुरावे हे दर्शवतात की, विठ्ठल भक्तीची ही परंपरा १५०० वर्षांहून अधिक जुनी असावी. १२३७ मधील होयसळ काळातील शिलालेख हा तर वारीच्या प्राचीनतेचा एक भक्कम लिखित पुरावा आहे. वारकरी संप्रदायाने केवळ भक्तीचा मार्ग चोखाळला नाही, तर त्यांनी विषमतेवर प्रहार करत समतेचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून सुरू झालेली ही वैचारिक क्रांती संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांच्या रूपाने जनसामान्यांपर्यंत पोहोचली.
 
या संतांच्या अभंगांतून महाराष्ट्राला एक नवी ऊर्जा मिळाली, ज्यामुळे लोकशाही मूल्यांची बीजे याच भूमीत पेरली गेली. वारी केवळ देवाला भेटण्यासाठी नसून ती स्वतःला आणि समाजाला घडवण्यासाठी केलेली एक तपश्चर्या आहे. यात प्रत्येक वारकरी हा विठ्ठल रूपातच दुसर्‍याकडे पाहतो, हीच या परंपरेची खरी ताकद आहे. या आध्यात्मिक प्रवासात सहभागी होणे म्हणजे स्वतःच्या अहंकाराला चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित करून, नामसंकीर्तनाच्या आनंदात न्हाऊन निघणे होय.
 
म्हणूनच वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती मानवी मनाला समृद्ध करणारी एक पवित्र जीवनशैली ठरली आहे. विशेष म्हणजे, ज्या काळात महाराष्ट्रावर मुघल आणि इतर आक्रमकांची मोठी संकटे होती, त्या काळातही वारीची परंपरा थांबली नाही. स्वराज्यावर जेव्हा मोठी संकटे आली होती, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांनीही या वारीच्या परंपरेचे रक्षण केले. औरंगजेबाचे सैन्य जेव्हा वारकर्‍यांवर हल्ले करत होते, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी वारकर्‍यांना केवळ अभय दिले नाही, तर या वारीला एक प्रकारचे राजकीय आणि सामाजिक संरक्षण प्रदान केले.
 
त्यांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनीही ही धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांनी १६९४ मध्ये येलवंडी गावाला इनाम देताना, युद्धाच्या धामधुमीतही पंढरपूरच्या यात्रेला कोणताही उपसर्ग पोहचू नये आणि वारकर्‍यांची सुरक्षितता जपली जावी, असे स्पष्ट आदेश दिले होते. स्वराज्यातील या छत्रपतींच्या दूरदृष्टीमुळेच ही आध्यात्मिक चळवळ अधिक बळकट झाली आणि वारी महाराष्ट्राची अस्मिता बनली. या वारीच्या रचनेमध्ये झालेला बदल हा तिच्या संघटित स्वरूपाचा इतिहास सांगतो. संत तुकाराम महाराजांच्या काळातील वारी आणि त्यानंतर नारायण महाराजांनी सुरू केलेली पालखी पद्धत, या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आहेत.
 
अठराव्या शतकात हैबत बाबा आरफळकर यांनी वारीला जी शिस्त लावली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. एका सरदाराचे अध्यात्माकडे वळणे आणि त्याने वारकरी संप्रदायाला लष्करी शिस्त, रिंगण आणि दिंड्यांच्या रचनेत गुंफून टाकणे, यामुळेच आजची वारी एक सुव्यवस्थित उत्सव बनली आहे. या शिस्तीमुळेच लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येऊनही वारीमध्ये एकोपा आणि शांतता टिकून राहते. ही व्यवस्था केवळ कागदावर नाही, तर ती वारकर्‍यांच्या नसानसात भिनलेली आहे. वारी ही समाजातील जातिभेद आणि उच्चनीचतेच्या भिंती पाडणारी एक मोठी चळवळ आहे.
 
पंढरीच्या वाटेवर सगळे समान होतात. तिथे कोणी राजा नाही आणि कोणी रंक नाही. ज्ञानोबा-तुकोबा असा जयघोष करत चालणारा प्रत्येक वारकरी हा केवळ एक भक्तीचा पाईक असतो. या प्रवासात प्रत्येक व्यक्तीला एक नवीन ओळख मिळते, ती म्हणजे वारकरी. या परंपरेनेच महाराष्ट्राला एक वेगळी सामाजिक दृष्टी दिली. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना पंढरपूरच्या वारीतूनच प्रेरणा मिळाली होती. सामुदायिक भक्ती कशी समाज परिवर्तनाचे साधन ठरू शकते, याचे वारी हे सर्वात मोठे उदाहरण आहे.
 
गेल्या १००० वर्षांत कधीही खंडित न झालेली ही वारी, २०२० मध्ये कोरोनाच्या जागतिक संकटामुळे काही काळ थांबली होती. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक पोकळी जाणवली. ती पोकळी केवळ देवाची नव्हती, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्वासाची होती. त्यातून पुन्हा एकदा ही परंपरा सावरून उभी राहिली, हे तिच्या लवचिकतेचे लक्षण आहे. वारीमध्ये सामील होणार्‍या लोकांच्या चेहर्‍यावरचा थकवा दिसत नाही, कारण त्यांच्या मनात एकच ओढ असते - विठ्ठलाची भेट. भेटीची ही आस त्यांना अटकेपार नेऊन पोहोचवते.
 
भेटी लागी जीवा लागलीसे आस या तुकोबांच्या ओळी आज ही हजारो वारकर्‍यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. आजच्या आधुनिक काळात, जिथे विज्ञानाचा आणि भौतिक प्रगतीचा बोलबाला आहे, तिथे वारीचे महत्त्व कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. नवीन पिढी जेव्हा पालखी सोहळ्यात सहभागी होते, तेव्हा त्यांना केवळ भक्तीच नाही, तर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासही अनुभवायला मिळतो. या पालखी सोहळ्याचे स्वरूप जरी काळानुसार बदलत गेले असले, तरी त्यातील विठ्ठल हा भाव कायम आहे.
 
ती एक अशी शक्ती आहे, जिने आपल्याला संकटकाळात धीर दिला आहे आणि शांततेच्या काळात माणुसकी शिकवली आहे. पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे. ही परंपरा आपल्याला शिकवते की, आयुष्यात कितीही संकटे आली तरी, भक्ती आणि श्रद्धेची साथ असेल तर माणूस कोणताही कठीण प्रवास आनंदाने पार करू शकतो. विठ्ठलाच्या ओढीने निघालेला हा प्रवास मानवी मनाच्या सीमा ओलांडून एका अथांग आनंदाच्या प्रवाहात विलीनहोतो. वारी अखंड सुरू राहो, कारण त्याच नादावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक अस्तित्व टिकून आहे. जोपर्यंत चंद्रभागा वाहत आहे आणि विठ्ठलाचे नामस्मरण होत आहे, तोपर्यंत वारीची ही संस्कृती चिरंतन राहील. ही वारी महाराष्ट्राची शान आहे, तिचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.