अलिबाग | रायगड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर निसर्गाच्या लहरीपणाचे सावट गडद झाले आहे. मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे सुरुवातीलाच पेरणी खोळंबली, तर त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने रोपवाटिकांचे मोठे नुकसान केले. परिणामी, अर्धा जुलै संपत आला असतानाही जिल्ह्यातील केवळ १.६७ टक्के क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली असून, अनेक भागांतील शेतकरी अजूनही पावसाच्या स्थिरतेची प्रतीक्षा करत आहेत.
जिल्ह्यात भात लागवडीचे नियोजित क्षेत्र मोठे असले तरी पावसाच्या विस्कळीत पॅटर्नमुळे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने रोपवाटिका उशिरा तयार झाल्या. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आणि सुमारे २ हजार १०० हेक्टरवरील रोपवाटिकांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणी आणि नव्याने रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली आहे.
यंदा लागवडीचा हंगाम वेळेत सुरू होईल, अशी अपेक्षा असताना हवामानातील सातत्याने होणार्या बदलांमुळे संपूर्ण शेतीचक्र विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने मशागतीची कामे ठप्प आहेत, तर काही भागांत पुरानंतर गाळ साचल्याने लागवड करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पारंपरिक लागवडीचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी सलग आणि संतुलित पावसाची आवश्यकता असते.
मात्र यंदा कधी पावसाची दीर्घ खंडित अवस्था, तर कधी अतिवृष्टी अशा दोन्ही टोकांच्या परिस्थितीमुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील लागवडीचा वेग अत्यंत मंदावला आहे. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू केले असून शेतकर्यांनी आवश्यक ती माहिती स्थानिक कृषी कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस संतुलित पाऊस झाल्यास उर्वरित क्षेत्रावर लागवडीला वेग मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सध्या तरी रायगडातील भात शेती मोठ्या संकटाच्या छायेखाली असल्याचे चित्र आहे.