पनवेल | कामोठे सेक्टर-२१ परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चार दिवसांत जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे पनवेल महानगर जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कुंडलिक वाघमारे यांनी दिला यासंदर्भात महादेव वाघमारे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नवी मुंबई यांना निवेदन सादर करून सेक्टर-२१ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, स्टार हाईट-३, वरली टॉवर, शुभ अव्हेन्यू, गुरुदेव सोसायटी, ओम शिवशंकर सोसायटी, निर्झर, जय प्राची यासह अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात आणि कमी पाणीपुरवठा होत आहे. नियोजित वेळेत पाणी येत असले तरी दाब कमी असल्याने भूमिगत टाक्या पूर्ण भरत नाहीत. परिणामी वरच्या मजल्यांवरील टाक्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उंच इमारतींमध्ये राहणार्या नागरिकांची परिस्थिती अधिक बिकट झाली असून अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर किंवा बाटलीबंद पाण्यावर अवलंबून लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाणीटंचाईचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून स्वयंपाक, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि लहान मुलांच्या गरजा भागविणे कठीण झाले आहे.