सुधागडमध्ये विहिरीत बुडून तरुणाचा मृत्य , रामनगर परिसरावर शोककळा

By Raigad Times    13-Jul-2026
Total Views |
bense
 
बेणसे । सुधागड तालुक्यातील रामनगर परिसरात रविवारी (12 जुलै) एक हृदयद्रावक घटना घडली. रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे विहिरीत बुडाल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
मृत युवकाचे नाव विघ्नेश सुरेश तेलंगे (वय 21, रा. रामनगर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश हा आपल्या चार मित्रांसोबत परिसरातील एका विहिरीजवळ गेला होता. त्यावेळी विहिरीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र विहिरीची खोली अधिक आणि पाणी गढूळ असल्याने बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला.
 
घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोलाड येथील विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अनेक तास अथक शोधमोहीम राबवल्यानंतर विघ्नेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अवघ्या 21 व्या वर्षी विघ्नेशच्या आकस्मिक निधनाने तेलंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या प्रकरणाची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.