माणगाव । जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक पाण्यात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी (12 जुलै) दुपारी घडली. घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि कोलाड येथील बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.
अंधार पडल्यामुळे सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु होईल, अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण एमआयडीसी काम करणार्या 20 जणांचा ग्रुप रविवारी पावसाळी पर्यटनासाठी देवकुंड परिसरात आला होता.
दुपारच्या सुमारास धबधब्याजवळ फिरत असताना पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या ग्रुपमधील गोपाळ राठोड (वय 23, मूळ राहणार - ता.मुखेड जिल्हा-नांदेड) आणि विष्णू ढोक (वय 22, मूळ राहणार-हिंगोली) दोघे तरुण पाण्यात वाहून गेले. दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्यासाठी कोलाड येथील विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र अंधार आणि तेथील बिकट परिस्थितीमुळे सायंकाळी उशिरा शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी (13 जुलै) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु केली जाईल, अशी माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिली.
विशेष म्हणजे, देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि सिक्रेट पॉइंट परिसरात 31 ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश माणगावच्या प्रांताधिकार्यांनी यापूर्वीच जारी केले आहेत. असे असतानाही काही पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. या भागात पोलीस आणि वन विभागाचा बंदोबस्त असतानाही पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात कसे पोहोचले, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाकडून या घटनेची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाळ्यात धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना केले आहे.